छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : ऐन उन्हाळ्यात शहरात निर्माण होणारी पाणीटंचाई आणि त्यातून नागरिकांची होणारी गैरसोय कमी करण्यासाठी महानगरपालिकेने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. शहराला पाणीपुरवठा करणारी ७०० मिमी व्यासाची अत्यंत जुनी आणि जीर्ण झालेली जलवाहिनी बंद करून, तिच्या जागी ९०० मिमी व्यासाची जलवाहिनी पूर्ण क्षमतेने सुरू केली जाणार आहे. या निर्णयामुळे शहराच्या पाणीपुरवठ्यात सुमारे १२ एमएलडीने (दशलक्ष लिटर) वाढ होणार असून, पाणीपुरवठ्यातील अंतर (गॅप) कमी करण्यास मदत होईल.
महापौर समीर राजुरकर यांनी पाणीपुरवठा विभागाची बैठक घेऊन सादर केलेल्या अहवालानुसार, सध्या शहराला १५० ते १६० एमएलडी पाणीपुरवठा होत आहे. यामध्ये १०० एमएलडी योजनेतून ९५ ते ९८ एमएलडी, ९०० मिमी वाहिनीतून २६ एमएलडी आणि ७०० मिमी वाहिनीतून ३० ते ३५ एमएलडी पाणी मिळते.
मात्र, ७०० मिमीची वाहिनी बंद करून ९०० मिमीची पाइपलाइन पूर्ण क्षमतेने कार्यान्वित केल्यास त्यातून सुमारे ७२ एमएलडी पाणी आणण्याचे नियोजन आहे. जायकवाडी येथील ४२२ एचपी क्षमतेच्या पंपाद्वारे हे पाणी फारोळा येथील जलशुद्धीकरण केंद्रात आणले जाईल, ज्यामुळे एकूण पाणीपुरवठा १७० ते १७२ एमएलडीपर्यंत पोहोचेल.












